सोलापूर : जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी सन २०२६-२०२७ या आर्थिक वर्षासाठी हयातीचा दाखला (डिजिटल लाईफ सर्टिफिकेट – DLC) सादर करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, सोलापूर तसेच जिल्ह्यातील सर्व उपकोषागार कार्यालयांच्या ठिकाणी गुरुवार, दि. २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात निवृत्तीवेतनधारकांना डिजिटल पद्धतीने हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मार्गदर्शन व आवश्यक सहकार्य करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व निवृत्तीवेतनधारक व कुटुंब निवृत्तीवेतनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी डॉ. वैभव राऊत यांनी केले आहे.
मेळाव्यास उपस्थित राहताना संबंधितांनी स्वतःचा मोबाईल, आधारकार्ड, निवृत्तीवेतन आदेश (PPO) आणि बँक पासबुकची प्रत सोबत आणावी. तसेच हयातीचा दाखला ऑनलाइन पद्धतीने सादर करण्यासाठी https://jeevanpramaan.gov.in या जीवन प्रमाण पोर्टलचा वापर करता येईल. अँड्रॉइड स्मार्टफोनवर ‘जीवन प्रमाण’ (Jeevan Pramaan) ॲप डाउनलोड करूनही ही प्रक्रिया पूर्ण करता येते.
याबाबत अधिक माहितीसाठी निवृत्तीवेतनधारकांनी solapur.pension@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२१७-२७३१०३६ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.










