सेवा संकल्प अभियानाचा’ उत्साहात शुभारंभ
अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम; सेवा, विकास आणि लोकसहभागाचा संकल्प
सोलापूर : ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत शासकीय सेवा व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासोबतच ग्रामविकासाला अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ आज उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य होते. यावेळी अर्थ व बांधकाम समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अमृता वाघे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्यासह जिल्हा परिषदेतील सर्व विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी केले. त्यांनी अभियानाची भूमिका, उद्दिष्टे आणि जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांनी आपल्या मनोगतातून सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद साधत शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक वैद्य यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करताना ‘सेवा संकल्प अभियान अधिक चांगल्या, प्रभावी आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावे’, असे आवाहन केले. नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक विभागाने आपल्या जबाबदारीच्या माध्यमातून अभियान यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे त्यांनी सांगितले.
एक दिवस स्वच्छतेसाठी द्या – उपाध्यक्ष इंद्रजीत पवार
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी संकल्प सेवा अभियाना बरोबर २ आॅक्टोबर रोजी स्वच्छता महा श्रमदानात सहभागी होण्याचे आवाहन केलें. बिबिदारफळ मध्ये ४९ वा रविवार आहे. मार्डीने याची सुरुवात केली. अकोलेकाटी व बिबिदारफळ या कामात पुढाकार घेऊन श्रमदान करीत आहे. एक दिवस स्वच्छतेसाठी द्या असे आवाहन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी केले.
सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी आपल्या मनोगतात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी वर्गाने अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केलेल्या नियोजनाचे कौतुक केले. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत विविध उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी अधिकारी वर्गाने अतिशय सुंदर नियोजन केले असून, सर्वांनी समन्वयाने काम करून हे अभियान यशस्वी करावे, असे त्यांनी सांगितले.
या अभियानाच्या माध्यमातून ‘शासन आपल्या दारी’ या भावनेला अधिक व्यापक स्वरूप देत नागरिकांना आवश्यक शासकीय सेवा, दाखले, प्रमाणपत्रे व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित नागरिक सेवा व कामांचा शक्य तितका निपटारा करण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत.
सेवा संकल्प ग्रामसभेतून अभियानाला सुरुवात.
सदर अभियान दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे.
ग्रामपंचायतीमध्ये ‘सेवा संकल्प ग्रामसभा’ आयोजित करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. या ग्रामसभेत अभियानाची उद्दिष्टे व स्वरूप नागरिकांना समजावून सांगणे, उपलब्ध शासकीय सेवा व योजनांची माहिती देणे, गावातील प्राधान्याची विकासकामे व स्थानिक गरजांवर चर्चा करणे तसेच आगामी उपक्रमांचे नियोजन करण्यावर भर देण्यात आला आहे. महिला बचत गट, युवक, ग्रामस्तरीय समित्या, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग निश्चित करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.
चार आठवड्यांत गावाच्या सर्वांगीण विकासाचा कृती आराखडा
सेवा संकल्प अभियान’ केवळ एक दिवसाचा उपक्रम न राहता संपूर्ण महिनाभर विविध विषयांवर केंद्रित पद्धतीने राबविण्यात येणार आहे.
पहिला सप्ताह – सुशासन व नागरिक सेवा :
नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, विविध दाखले व प्रमाणपत्रे, जन्म-मृत्यू नोंदणी, आयुष्मान भारत कार्ड, दिव्यांग प्रमाणपत्रे तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.
दुसरा सप्ताह – संस्था व सार्वजनिक सुविधांचे सक्षमीकरण :
शाळा, अंगणवाडी, स्मशानभूमी आणि इतर सार्वजनिक संस्थांमधील मूलभूत सुविधांच्या सक्षमीकरणावर भर देण्यात येणार आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, स्वच्छता, संरक्षण भिंत, परसबाग तसेच आवश्यक दुरुस्तीची कामे* लोकसहभागातून आणि उपलब्ध योजनांच्या अभिसरणातून गतीमान करण्याचे नियोजन आहे.
तिसरा सप्ताह – जलसमृद्ध, स्वच्छ व हरित गाव :
जलसंधारण, जलस्रोतांची स्वच्छता, पाणीपुरवठा व नळजोडणी, घनकचरा व्यवस्थापन, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, प्लास्टिक मुक्ती, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन यांसारख्या उपक्रमांना प्राधान्य दिले जाणार आहे.
चौथा सप्ताह – आरोग्य, पोषण, महिला सक्षमीकरण व उपजीविका :
आरोग्य तपासणी शिबिरे, पोषण व ॲनिमियाबाबत जनजागृती, महिलांचे आरोग्य व स्वच्छता, महिला बचत गटांचे सक्षमीकरण, महिला शेतकरी उत्पादक संस्था आणि आर्थिक सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
‘गावासाठी एक दिवस’ – श्रमदानातून लोकसहभागाची नवी चळवळ
अभियानातील विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक आठवड्यात किमान एक दिवस ‘गावासाठी एक दिवस’ या संकल्पनेतून श्रमदान व लोकसहभागाचे उपक्रम राबविणे. ग्रामस्थ, महिला बचत गट, युवक मंडळे, ग्रामस्तरीय समित्या, स्थानिक संस्था आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून स्वच्छता, जलस्रोत स्वच्छता, शाळा-अंगणवाडी परिसर सुधारणा, वृक्षसंवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण यांसारखी कामे केली जाणार आहेत. हे श्रमदान केवळ औपचारिक न राहता गावाच्या प्रत्यक्ष गरजेशी संबंधित आणि दृश्यमान परिणाम निर्माण करणारे असावे, अशी स्पष्ट अपेक्षा शासन निर्णयात व्यक्त करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव जाधव यांनी केले तर आभार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी व्यक्त केले













