येस न्युज मराठी नेटवर्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी करोना लसीकरणाच्या मुद्द्यावर चर्चा केली. करोना लसीकरणाची मोहीम देशात १६ जानेवारीपासून सुरू होणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन कोटी नागरिकांना करोनाची लस दिली जाईल. लसीकरणाची तयारी पूर्ण झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी मिळून काम करण्याचं आवाहन मोदींनी केलं.
कोरोनाविरूद्धच्या लढाईत भारत लसीकरणाच्या निर्णायक टप्प्यात प्रवेश करत आहे. १६ जानेवारीपासून जगातील सर्वात मोठा लसीकरण मोहीम सुरू करत आहोत. करोनाविरूद्धच्या लढाईत सरकारने केलेल्या कामांची मोदींनी माहिती दिली. तसंच या संकटाच्या काळात सर्वांनी एकजुटीने काम केलं. लवकर निर्णय घेतले आणि म्हणूनच इतर देशांच्या तुलनेत भारतात करोनाचा संसर्ग तितक्या मोठ्या प्रमाणात झाला नाही, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
‘अफवा थांबवण्याची जबाबदारी राज्यांची’
लसीसंबंधित कोणत्याही अफवा थांबवणं ही राज्यांची जबाबदारी आहे. संस्था, कॉर्पोरेट स्पर्धा आणि इतर घटकांद्वारे गोंधळाची स्थिती निर्माण केली जाऊ शकते. म्हणून आपण सतर्क राहून कोणत्याही अफवा थांबवण्याची गरज आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.