येस न्युज मराठी नेटवर्क : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी २५ डिसेंबरला पुन्हा शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. उत्तर प्रदेशातील अवधच्या शेतकर्यांशी पंतप्रधान मोदी नवीन कृषी कायद्यांचे फायदे सांगतील. यासह उत्तर प्रदेश भाजपचे कार्यकर्ते केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घरोघरी जाऊन शेतकऱ्यांना देतील.
एवढेच नव्हे तर २५ डिसेंबरला अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी संपूर्ण उत्तर प्रदेशातील शेतकर्यांच्या अडीच हजार चौपालशी जुळतील. राज्यातील अडीच हजाराहून अधिक ठिकाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजप एक मोहीम राबवेल. यामध्ये पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकऱ्यांशी संपर्क साधतील.
उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना जोडणारा हा मेगा प्रोग्राम होणार आहे. एकट्या अवधमध्ये ३७७ ठिकाणी तर संपूर्ण उत्तर प्रदेशात अडीच हजाराहून अधिक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे.
दुसरीकडे, दिल्लीत २८ व्या दिवशीही शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी टीम बनवल्या आहेत. चर्चेसाठी प्रस्ताव तयार केले जात आहेत. सरकारच्या प्रस्तावावर मंथन होतंय. तर सरकारच्या वतीनेही शेतकर्यांना पटवून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट करून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे.