सोलापूर : सदर बाजार पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर काही वेळातच एका २८ वर्षीय विवाहितेने घरी जाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी पूर्वीच्या गुन्ह्यामध्ये आता ‘हुंडाबळी’चे कलम वाढवले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक २१ नोव्हेंबर २०२६ रोजी ज्ञानेश्वरी रोहित जाधव (वय २८) या विवाहित महिलेने सदरबाजार पोलीस ठाण्यात आपल्या सासरच्यांविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ८५, ११५(२), ३५१(२), ३५२ आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवल्यानंतर काही वेळानंतरच ज्ञानेश्वरी यांनी घरी जाऊन आत्महत्या केली.
या घटनेनंतर सदरबाजार पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ची नोंद करण्यात आली आहे. तपासादरम्यान या प्रकरणातील गांभीर्य पाहता, मयत ज्ञानेश्वरी यांनी यापूर्वी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये आता हुंडाबळीचे कलम वाढवण्यात आले आहे.त्याचा रीतसर अहवाल माननीय न्यायालयात सादर करण्यात आला असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर यांनी दिली आहे.











