पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांचे प्रतिपादन; जिल्हास्तरीय किल्ला व घरकुल बांधणी स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास, गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि महाराष्ट्राचा समृद्ध सांस्कृतिक वारसा नव्या पिढीच्या मनामनांत रुजविण्याबरोबरच बालकलाकारांच्या कल्पकतेला व कलागुणांना व्यासपीठ मिळवून देणारी किल्ले बांधणी स्पर्धा ही एक प्रकारची ऐतिहासिक प्रयोगशाळाच आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांनी केले.
चित्रस्पर्श कलाविहार आणि संजीवनी आर्ट क्राफ्ट गॅलरी, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय किल्ला व घरकुल बांधणी स्पर्धा २०२६ चा पारितोषिक वितरण सोहळा बुधवार, दि. २५ नोव्हेंबर रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे उत्साहात पार पडला. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील आणि सातारा येथील इतिहास अभ्यासक प्रा. अमृत साळुंखे प्रमुख उपस्थित होते.
किल्ले बांधणी म्हणजे इतिहासाची जिवंत अनुभूती!
पोलीस निरीक्षक संगीता पाटील म्हणाल्या की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मला नेहमीच प्रेरणा देत आला आहे. महाराजांचे विचार, त्यांचे शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेचा संघर्ष आजही प्रत्येकाला प्रेरणा देणारा आहे. मुलांनी स्वतःच्या हातांनी किल्ल्यांच्या प्रतिकृती तयार करताना त्या इतिहासाचा अभ्यास करणे, त्यामागील विचार समजून घेणे आणि त्यातून प्रेरणा घेणे महत्त्वाचे आहे. किल्ले बांधणी स्पर्धा हा केवळ कलाविष्कार नसून इतिहास बालमनांमध्ये रुजविण्याचा एक अभिनव प्रयोग आहे.
किल्ल्यांच्या रचनेमागील विज्ञान आणि स्थापत्यशास्त्र समजून घ्या!
सातारा येथील इतिहास अभ्यासक प्रा. अमृत साळुंखे यांनी गड-किल्ल्यांच्या विविध प्रकारांची, त्यांच्या स्थापत्यशैलीची आणि संरक्षण व्यवस्थेची सविस्तर माहिती दिली. किल्ल्यांचे प्रवेशद्वार, बुरूज, तटबंदी, माची, पाण्याची व्यवस्था, चोरदरवाजे तसेच किल्ल्यांवरील विविध वास्तूंची रचना यामागील ऐतिहासिक आणि सामरिक उद्देश त्यांनी उलगडून सांगितले. किल्ल्याच्या बांधकामातील प्रत्येक वास्तूला विशिष्ट महत्त्व असून त्यामागे संरक्षण, नियोजन आणि युद्धनीतीचा विचार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सध्या सुरू असलेल्या प्रतापगडाच्या पुनर्रचनेच्या कामासंदर्भात त्यांनी विशेष पॉवरपॉइंट सादरीकरणही केले. यामुळे उपस्थितांना किल्ल्यांची रचना, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि संवर्धनाची गरज अधिक प्रभावीपणे समजून घेता आली.
अल्प मनुष्यबळात किल्ल्यांच्या बळावर स्वराज्याचे संरक्षण!
शिवव्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे यांनी आपल्या मार्गदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतील गड-किल्ल्यांचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. अत्यंत मर्यादित मनुष्यबळ आणि साधनसामग्री असतानाही किल्ल्यांच्या भक्कम संरक्षण व्यवस्थेचा उपयोग करून मराठ्यांनी आपल्या स्वराज्याचे रक्षण कशा पद्धतीने केले, याचे ऐतिहासिक दाखले त्यांनी दिले.
किल्ले हे केवळ दगड-मातीच्या वास्तू नसून ते स्वराज्याच्या सामर्थ्याचे, दूरदृष्टीचे आणि युद्धनीतीचे प्रतीक आहेत. अशा स्पर्धांच्या माध्यमातून मुलांमध्ये इतिहासाविषयी जिज्ञासा, अभ्यासाची वृत्ती, सर्जनशीलता आणि राष्ट्राभिमान निर्माण होण्यास मदत होते, असेही त्यांनी सांगितले.
किल्ला स्पर्धेतील विजेते :
१. भक्ती सोलापूरे, निम्बर्गी
२. साई अडसुळे
३. सिद्धरामा सुतार, निम्बर्गी
४. आयुष आळगी, मेघराज पाटील व यश माळगे, शेळगी
५. आयुष्य राऊत व तनय राऊत
घरकुल स्पर्धेतील विजेते :
१. वैष्णवी चन्ना
२. मिनाक्षी कोटा व सौंदर्य कोटा
३. मोक्षदा दुदाम
४. हरिका दासरी
५. अधिरा व प्रीती जितुरे
या स्पर्धेचे परीक्षण कोल्हापूर येथील चित्रकार अनिकेत कांबळे यांनी केले. पारितोषिकप्राप्त स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास नगरसेवक व सीए विनोद भोसले, युवा उद्योजक सिद्धाराम डोमनाळे, चित्रकार ऋत्विज चव्हाण, डॉ. रोहित गणोचारी, प्रशांत गायकवाड, समर्थ बाकळे, सुरज मलजी, बाबूराव बुऱ्हाणपुरे, विजय बाहेती, अतिश वाघमारे (मेजर) आदी मान्यवर उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार तथा चित्रस्पर्श कलाविहारचे संचालक डॉ. सचिन खरात आणि संजीवनी आर्ट क्राफ्ट गॅलरीचे चेतन बुऱ्हाणपुरे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सचिन खरात यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. रवींद्र देशमुख यांनी केले, तर आभार चेतन बुऱ्हाणपुरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सुजल बोरामणी, रितेश पारसवार, बाबू वाघमारे आणि गायत्री यांनी परिश्रम घेतले.













