रसिकांच्या गर्दीने हुतात्मा स्मृती मंदिर तुडुंब : सभागृहाबाहेरही प्रचंड गर्दी
सोलापूर : प्रतिनिधीजयमाला शिलेदारांनी स्वतः बोलावून शिकवलेले गाणे, प्रत्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी कवितेवर बोलायला दिलेली संधी, स्वतःचे च गाणे गाताना सुधीर फडकेंच्या अंगावर आलेले शहारे अन आपण संगीत दिलेले लता दीदींनी गायलेले गाणे असे प्रख्यात संगीतकार आणि गायक डॉ. सलील कुलकर्णी यांचे संगीतकार म्हणून झालेल्या प्रवासाचेअनेक किस्से आणि सोबतीला रसिकांच्या मनाचा ठाव घेणारी लोकप्रिय गाणी ऐकत रविवारी तीन दिवसीय प्रिसिजन गप्पांचा थाटात समारोप झाला.प्रिसिजन गप्पांच्या समारोपाच्या दिवशी रविवारी डॉ. सलील कुलकर्णी यांनी ‘कवितेचं गाणं होताना’ हा कार्यक्रम सादर केला. त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव आणि गायक शुभंकर कुलकर्णी आणि गायिका सन्मिता धापटे – शिंदे यांनी सहगायन केले.प्रारंभी प्रिसिजन कॅमशाफ्टचे चेअरमन यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, प्रिसिजन कॅमशाफ्टचे कार्यकारी संचालक करण शहा यांच्या हस्ते गायक डॉ. सलील कुलकर्णी, शुभंकर कुलकर्णी, सन्मिता धापटे यांच्यासह वादकांचा सन्मान करण्यात आला. प्रिसिजनचे मुख्य जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.’चला पंढरीसी जाऊ’ या जगद् गुरू संत श्री तुकाराम महाराजांच्या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

यानंतर सन्मिता धापटे – शिंदे यांनी ‘सत्यवदे वचनाला नाथा’ हे नाट्यगीत सादर केले. सलील कुलकर्णी आणि शुभंकर कुलकर्णी यांनी ‘त्या फुलांच्या गंधकोशी’, ‘तू तेंव्हा तशी’ ही गीते सादर केली.’कुशलव रामायण गाती’ या सलील कुलकर्णी यांनी सादर केलेल्या गाण्याला रसिकांनी जोरदार टाळ्यांनी प्रतिसाद दिला. ‘एका माकडाने काढलंय दुकान’, ‘बाबा म्हणतो’, ‘अग्गो बाई ढग्गो बाई’ अशा बालगीतांवर चिमुकल्यांनी ठेका धरला.डॉ. सलील कुलकर्णी यांनी सादर केलेल्या स्वरचित ‘नवीन डेटापॅक दे रे’ या कवितेने रसिकांना पुन्हा एकदा अंतर्मुख केले. ‘दिवस असे की’, ‘जा दिले मन’, ‘नसतेस घरी तू जेंव्हा’ या गीतांनाही सोलापूरकरांनी टाळ्यांचा कडकडाट करत प्रतिसाद दिला. अश्विन रानडे यांनी संवादकाची भूमिका उत्कृष्टरित्या बजावत डॉ. सलील कुलकर्णी यांना बोलते केले.गायकांना तबल्यावर आदित्य आठल्ये,पखवाजवर डॉ. राजेंद्र धुरकर तर सिंथेसायझरवर दर्शना जोग यांनी साथसंगत केली.

डॉ. सलील कुलकर्णी प्रथमचमहाराष्ट्रासमोर वेगळ्या रूपातप्रख्यात संगीतकार आणि गायक कुलकर्णी गेल्या ३० वर्षांपासून गायन आणि संगीत क्षेत्रात महाराष्ट्राला परिचित आहे परंतु स्वतःच्या संगीतकार म्हणून झालेल्या प्रवासाचा कार्यक्रम महाराष्ट्रात प्रथमच प्रिसिजन गप्पांच्या मंचावर त्यांनी सादर केला हे या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरले.
प्रेक्षक चक्क एक तास आधी सभागृहात दाखलप्रिसिजन गप्पांमधील डॉ. सलील कुलकर्णी यांचा कार्यक्रम सोलापूरकर रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला. कार्यक्रम सुरू होण्याची वेळ ६.२५ असतानाही आधीच जागा मिळविण्यासाठी चक्क एक तास अगोदरपासून रसिकांनी हुतात्मा स्मृती मंदिर सभागृहात हजेरी लावली. सभागृहाच्या बाहेरही रसिकांनी मोठी गर्दी केली होती.










