येस न्युज मराठी नेटवर्क : फिरकीपटू आर अश्विनने केलेल्या धमाकेदार गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १९१ धावांवर गुंडाळले आणि ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव २४४ धावांवर संपुष्ठात आणला. पण त्यानंतर जसप्रीत बुमराह, अश्विन आणि उमेश यादव यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना गोलंदाजीवर नाचवले.
वृद्धीमान साहा आणि आर अश्विन यांनी डावाला सुरूवात केली. पण दिवसाच्या पहिल्याच ओव्हरमध्ये अश्विन बाद झाला. त्यानंतरच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये साहा ९ धावांवर माघारी परतला. त्यानंतर उमेश यादव (६) आणि मोहम्मद शमी यांना बाद करत ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव २४४ वर संपुष्ठात आणला. भारताला कालच्या धावसंख्येत फक्त ११ धावांची भर टाकता आली.
ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ५३ धावात ४ विकेट घेतल्या. तर पॅट कमिंन्सने ४८ धावात ३ विकेट, जोश हेजलवूड आणि नाथन लॉयन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
ऑस्ट्रेलियाकडून मॅथ्यू वेड आणि जो बर्न्स यांनी डावाची सुरूवात केली. या जोडीने पहिली धाव घेण्यासाठी २८ चेंडू घेतले. ऑस्ट्रेलिया संघाची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ही सर्वात संथ सुरूवात झाली. १५व्या षटकात जसप्रीत बुमराहने मॅथ्यू वेडची विकेट घेत भारताला पहिले यश मिळून दिले. वेड ८ धावांवर माघारी परतला. त्यानंतर १७व्या षटकात पुन्हा एकदा बुमराहने ऑस्ट्रेलिया धक्का दिला. त्याने ज बर्न्सला ८ धावांवर माघारी पाठवले आणि यजमानांची अवस्था २ बाद २९ अशी केली.