अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत नवा ट्विस्ट.
येस न्यूज मराठी : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी नुकतेच डॉक्टर सुजय विखे पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या निवडीनंतर लगेचच राजकीय व सहकार वर्तुळात मोठा ट्विस्ट आला असून सहकार न्यायालयाने सुजय विखे यांच्यासह जिल्हा बँक आणि निवडणूक प्रक्रियेतील संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
थकबाकीदार असल्याचा दावा:
सुजय विखे हे राहुरी येथील बाबुराव तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक असताना, कारखान्याने जिल्हा बँकेचे कर्ज थकवले आहे. वैयक्तिक हमीवर घेतलेले हे कर्ज थकीत असल्यामुळे सहकार कायद्याच्या नियमांनुसार सुजय विखे हे थकबाकीदार ठरतात, असा आक्षेप त्यांचे विरोधक तथा निवडणूक क्षेत्रातील उमेदवार एकनाथ घोगरे यांनी घेतला आहे.
हाच धागा पकडून घोगरे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे विखे यांचा अर्ज फेटाळण्याची मागणी केली होती. मात्र, तिथे दाद न मिळाल्याने त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. खंडपीठाने या प्रकरणी सहकार न्यायालयात जाण्याचे निर्देश दिल्यानंतर, नगरच्या सहकार न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली.
तसेच सहकार न्यायालयाने या याचिकेची गंभीर दखल घेत सुजय विखे आणि इतर संबंधितांना नोटीस बजावली असून, या प्रकरणावर १६ नोव्हेंबर रोजी आपले म्हणणे व स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे १६ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या सुनावणीकडे आणि न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.










