अखेर तीन महिन्याच्या प्रतीक्षेनंतर मंगळवार म्हणजेच दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सोलापूर शहरातून 20 ई- बसेस धावणार आहेत. सोलापूर शहराला पी एम ई बस योजनेतून 100 बसेस मंजूर झाल्या आहेत. यात पहिल्या टप्प्यात 20 बसेस 13 ऑगस्ट रोजी सोलापूर शहरात दाखल झाले आहेत. मात्र चार्जिंग स्टेशनचे काम अर्धवट असल्यामुळे या बसेस विष्णू मिल कंपाऊंड येथील एक्झिबिशन ग्राउंड वर उभा करून ठेवण्यात आल्या आहेत. या बसेस चार्जिंग करण्यासाठी बुधवार पेठेत सुमारे 30 कोटी रुपये खर्चून महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या ईव्ही चार्जिंग स्टेशनचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी पाच चार्जिंग पॉईंट बसवले असून त्या माध्यमातून एकाच वेळेस दहा बसेस चार्जिंग होतात. एक बस चार्जिंग होण्यासाठी सुमारे एक तासाचा कालावधी लागतो आणि चार्जिंग झाल्यानंतर ही बस 160 किलोमीटर धावते. या बसेस चालवण्यासाठी जेबीएल कंपनीच्या माध्यमातून 45 चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या शहरातील रूट चा सर्वे सुरू असून दररोज ह्या बसेस चार्जिंग करून ट्रायल घेतली जात आहे. संपूर्ण एसी, शिवाय बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, आकर्षक रंगसंगती अशा या बसेस मंगळवारपासून सोलापुरात धावणार असल्यामुळे प्रवाशांना चांगली सेवा मिळणार आहे.











