ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी साधणार संवाद; कारखानदारांच्या मनमानीविरोधात आंदोलनाची दिशा ठरणार
येस न्यूज मराठी नेटवर्क: सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराचा प्रश्न अद्यापही अनिर्णित असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी उद्या (रविवारी) पंढरपुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात ऊसदराच्या प्रश्नावर आंदोलन करून यश मिळवल्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातील ऊसदराच्या लढ्याला दिशा देण्यासाठी ते पुढाकार घेणार आहेत.
कोल्हापुरात आंदोलनानंतर ऊसाला प्रतिटन ४,२०० रुपये दर मिळवण्याबाबत लेखी आश्वासन मिळवण्यात संघटनेला यश आले. मात्र, सोलापूर जिल्ह्यात ऊसदराच्या प्रश्नावर शेतकऱ्यांमध्ये एकजूट नसल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी संघटना आणि कारखानदारांची बैठक बोलावूनही कारखानदारांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहिले होते.
सध्या सोलापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडून ऊसाला प्रतिटन ३,००० ते ३,१०० रुपये दर दिला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. कारखानदारांच्या या मनमानीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक भूमिका घेणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळवून देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संघटनेच्या लढ्याला साथ द्यावी, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे. उद्याच्या पंढरपूर येथील बैठकीत ऊसदराच्या आंदोलनाची पुढील दिशा निश्चित होण्याची शक्यता आहे.











