राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश अबिटकर यांनी काल सोलापुरात घेतलेल्या जन आरोग्य संवाद यात्रेला जोरदार प्रतिसाद मिळाला. विविध लोकप्रतिनिधी, खाजगी डॉक्टर, त्यांच्याबरोबर संवाद साधून त्यांनी आरोग्य यंत्रणेमध्ये कशी सुधारणा होईल यासाठी आरोग्य उपसंचालकांसह जिल्हा शल्यचिकिसा पर्यन्त सर्वांनाच धारेवर धरले. वडाळा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर शंकर बोरकर तसेच मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयातील डॉ. स्वाती बोधले यांना तातडीने घरचा रस्ता दाखवा. तसेच आमदार अभिजीत पाटील यांना चुकीचे उत्तर दिल्या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांना आजच कारणे दाखवा नोटीस काढा असे बैठकीमध्ये आरोग्यमंत्र्यांनी उपसंचालकांना सांगितले होते. कालचा दिवस संपून आजचा दिवस देखील संपला मात्र आरोग्य उपसंचालकांनी मंत्र्यांचे हे आदेश अक्षरशः केराच्या टोपलीत टाकले. डॉक्टर बोरकर यांना निलंबित करण्याऐवजी त्यांची चौकशी करण्यासाठी आरोग्य सहसंचालक डॉक्टर दिलीप सौंदळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सतीश कोपुरवाड, आणि जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा डोईफोडे यांची चौकशी समिती नेमली. या समितीने आजच म्हणजे सहा नोव्हेंबर रोजी वडाळा येथे जाऊन चौकशी करून सायंकाळी सहा वाजेपर्यंत अहवाल द्यावा असे परिपत्रकात सांगण्यात आले. मात्र वरील तिघांपैकी कोणीही वडाळा ग्रामीण रुग्णालयाकडे फिरकले नाहीत.त्यामुळे हा आदेश तोंडाला पाने पुसण्यापुरता काढला की काय अशी शंका निर्माण झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांना देखील नोटीस काढली नाही. एकूणच आरोग्य यंत्रणेमध्ये सुधारणा आणण्यासाठी आरोग्य मंत्री आबिटकर हे जीव तोडून प्रयत्न करत आहे मात्र त्यांचेच अधिकारी त्यांचा हा प्रोग्राम हाणून पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यावर मंत्री आता काय ॲक्शन घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.










