गेल्या तीन दिवसापासून सोलापुरात भाजपचे आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध खासदार प्रणिती शिंदे यांच्यात सोशल मीडियाच्या माध्यमातून शाब्दिक वार सुरू होते. आमदार देवेंद्र कोठे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांना महा गाढव म्हटल्यानंतर चिडलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी देवेंद्र कोठे यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना कुत्रा असे म्हटले. सोशल मीडियातील हा वार रविवारी मध्यरात्री थेट समोरासमोर भिडला. आमदार देवेंद्र कोठे हे चेतन नरोटे राहत असलेल्या दमानी नगर येथील इंद्रधनु अपार्टमेंट परिसरात रात्री एक वाजता गेले होते. तिथे देवेंद्र कोठे विरुद्ध चेतन नरोटे आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद तसेच हमरी तुमरी झाली.एवढेच नव्हे तर एकमेकांच्या अंगावर धाऊन जाण्याचे प्रकार घडले. त्यामुळे मध्यरात्री इंद्रधनु अपार्टमेंटमध्ये ऐन दिवाळीत हा राजकीय तमाशा अनेकांनी पाहिला. पोलिसांचा फौज फाटा देखील आला होता. शेवटी रात्री दीड वाजता आमदार सचिन कल्याणशेट्टी हे नवी वेस्ट पोलीस चौकी जवळील आमदार देवेंद्र कोठे यांच्या कार्यालयात आले आणि त्यांनी आमदार देवेंद्र कोठे यांची समजूत घातली.
या प्रकारामुळे इंद्रधनु अपार्टमेंटच्या परिसरात आज सकाळी देखील मोठा पोलीस बंदोबस्त होता. आमदार देवेंद्र कोठे यांचे कार्यालय, त्यांचे निवासस्थान या ठिकाणी देखील बंदोबस्त लावण्यात आला आहे. रामलाल चौकात देखील मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या घडलेल्या प्रकरणाबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांनी रात्री पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याशी चर्चा केली.या घटनेचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. देवेंद्र कोठे विरुद्ध चेतन नरोटे यांचा हा जुना राजकीय वाद मिटवण्यासाठी आता वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न होणे गरजेचे आहे अन्यथा याचे वेगळेच परिणाम दिसतील.










