दोन दिवसात तोडगा न निघाल्यास राजू शेट्टी सोलापुरात.
येस न्यूज नेटवर्क: कोल्हापुरात कारखानदारांनी चालू वर्षी ३८०० रुपये प्रतिटन एकरकमी उचल व साखरेची आधारभूत किंमत वाढल्यानंतर ४००० प्रतिटन अंतिम दर देण्याचे मान्य केले आहे . तरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हा दर मान्य नसून ४५०० पहिली उचल मागितली आहे. व आंदोलन सुरू ठेवले आहे.
सोलापूर जिह्यात महिन्यापासून गाळप सुरू असून अद्याप कुठल्याही कारखान्याने ऊस दर जाहीर केलेला नाही. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ऊसदरावर तोडगा काढण्याची विनंती केली असून तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखी तीव्र करून जिल्ह्यातील सर्व कारखाने बंद पडण्याचा इशारा दिला आहे.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्या दोन नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी यांनी सोलापुरातील कारखानदार व ऊस उत्पादक शेतकरी यांच्यासोबत बैठक बोलावली आहे. सदर बैठकीत तोडगा न निघाल्यास सोलापुरात येऊन कारखाने बंद पाडू व शेतकऱ्याना न्याय मिळवून देऊ असा कडक इशारा शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.










