बी. बी. दारफळ ते लोकमंगल साखर कारखाना मार्गावरिल ऊसाच्या गाड्या रोखल्या; योग्य दर मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार.
सोलापूर : ऊसाला योग्य दर मिळावा, या मागणीसाठी बी. बी. दारफळ परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. बी. बी. दारफळ ते लोकमंगल साखर कारखाना मार्गावर शेतकऱ्यांनी ऊसाच्या गाड्या रोखून धरल्याने ऊसदराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
खते, बियाणे, मजुरी, डिझेल आणि इतर शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतींमुळे ऊस उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्या तुलनेत मिळणारा दर परवडत नसल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
ऊसाला प्रतिटन ४ हजार रुपये दर जाहीर करावा, अशी शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. योग्य दर निश्चित झाल्याशिवाय ऊसाच्या गाड्या कारखान्याकडे जाऊ देणार नसल्याची भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. यामध्ये पांडुरंग जाधव, समाधान साठे, अशोक ननवरे यांसह बीबी दारफळ येथील ऊस उत्पादक शेतकरी सहभागी होते
ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. आता साखर कारखाना व्यवस्थापन या मागणीवर काय भूमिका घेते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.











