सोलापूर : पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदार यादीत नाव नोंदविलेल्या पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना नियमानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात येणार असल्याची माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार, जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांना याबाबत लेखी सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक पात्र शिक्षकाने मतदानाचा हक्क बजावावा, तसेच मुख्याध्यापकांनी संबंधित शिक्षकांना मतदानासाठी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
भारत निवडणूक आयोगाने २२ सप्टेंबर २०२६ रोजी जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार, पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.
या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील सर्व व्यवस्थापनांच्या अधीन कार्यरत असलेल्या आणि संबंधित मतदारसंघाच्या मतदार यादीत नाव नोंदविलेल्या पात्र शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदानासाठी आवश्यक ती सवलत देणे गरजेचे आहे.
त्यानुसार, मतदानासाठी पात्र असलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी नियमानुसार विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करावी. संबंधित पात्र मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर जाऊन मतदान करता येईल, याची दक्षता घ्यावी. तसेच, मंजूर रजेची नोंद संबंधित शाळेच्या अभिलेखात नियमानुसार करण्यात यावी.
या सूचनांची आपल्या अधीनस्थ सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना माहिती देऊन त्यांची काटेकोर अंमलबजावणी करावी. या कामास प्राधान्य देऊन आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिल्या आहेत.










