सोलापूर : जिल्ह्यात जाहीर झालेल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सोलापूर महानगरपालिकेतील सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सागर योगीराजेंद्र टूरके, वैभव जवळकोटे आणि राजू अण्णा कलमाडी यांनी केली आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे अर्ज सादर करून विशेष सभा बोलावण्याची मागणी करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळामुळे शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य नागरिक आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. या परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत मिळावी, यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा, असे अर्जात नमूद करण्यात आले आहे.
सध्या जिल्ह्यात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने, त्यातील नियमांचे पालन करून तसेच आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाची पूर्वपरवानगी किंवा मार्गदर्शन घेऊन विशेष सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या विशेष सभेत सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा ठराव सर्वपक्षीय संमतीने एकमताने मंजूर करावा. त्यानंतर जमा होणारी एकत्रित रक्कम सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दुष्काळ निवारणासाठी सुपूर्द करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.
दुष्काळग्रस्तांना मदत मिळण्यासाठी महापालिकेने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने निर्णय घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सागर टूरके, वैभव जवळकोटे आणि राजू अण्णा कलमाडी यांनी केले आहे.











