सोलापूर महापालिकेची परिवहन बस व्यवस्था सक्षम नसल्यामुळे शहरात अवैध रीक्षांचा सुळसुळाट सुरू आहे. शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ यांनी डोळ्यावर पट्ट्या बांधल्यामुळे आणि मंथली हप्ते सुरू असल्यामुळे याकडे दुर्लक्ष केले जात आहे. रिजनल ट्रॅफिक ऍथॉरिटी चे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात. जिल्हाधिकारी कार्तिकीयेन यांनी कालच आरटीओ तसेच महापालिका अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन शहरात नव्याने 61 रिक्षा थांबे मंजूर केले. शिवाय रिक्षा भाडेवाढ मंजूर केली.
पहिल्या दीड किलोमीटर साठी 30 रुपये आणि तिथून पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 20 रुपये दर निश्चित करण्यात आला. मात्र रिक्षांना मीटरच नाहीत याचीच माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली नाही. त्यामुळे सोलापूर शहरातील रिक्षाचालक मनमानी पद्धतीने भाडे आकारतात. अनेक रिक्षांचे फिटनेस प्रमाणपत्र नाही, त्यांचे रजिस्ट्रेशन नाही, रिक्षा चालकांकडे बॅच बिल्ले नाहीत.. प्रमाणात पेक्षा जास्त प्रवासी रिक्षात बसवले जातात. याकडे आरटीओ तसेच शहर वाहतूक शाखेने लक्ष देणे गरजेचे आहे. शहरातील सर्व रिक्षांना पुण्याप्रमाणे मीटर बंधनकारक केले पाहिजे. मीटर रीडिंग नुसारच मंजूर केलेले भाडे आकारणी केल्यास प्रवाशांची खूप मोठी लूट थांबणार आहे. याकडे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.










