56.940 ग्रॅम एमडीसह दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त; एका संशयितास अटक
सोलापूर : अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात सोलापूर शहर पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू ठेवला आहे. सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात कारवाई करत 56.940 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवाईत एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याकडून दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, पोलीस आयुक्त डॉ. एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. प्रितम यावलकर आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2 श्रीमती विजयालक्ष्मी कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने कारवाई केली.
पोलिसांना अमली पदार्थ विक्री करणाऱ्या इसमाबाबत माहिती मिळाल्यानंतर पथकाने रेल्वे स्टेशन परिसरात पेट्रोलिंग सुरू केले. यावेळी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील बाजूस, ब्रिजजवळील पाण्याच्या टाकीजवळील पार्किंगमध्ये एक इसम संशयास्पदरीत्या हालचाल करताना आढळून आला.
पोलिसांनी त्याच्यावर नजर ठेवून त्याला जागीच ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने आपले नाव अल्तमश मुस्तफा शेख (वय 32 वर्षे), रा. 52727 तुलसी नगर, बिस्मिल्ला बेकरीजवळ, खाजीनापेठ/खानजीनापेठ, सोलापूर असे सांगितल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे.
झडतीदरम्यान त्याच्याकडून 56.940 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन), दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल पंचनामा करून जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे येथे गुन्हा क्रमांक 817/2026, एन.डी.पी.एस. कायदा कलम 8(क), 22(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल सावंत करीत आहेत.
जप्त मुद्देमाल
56.940 ग्रॅम एमडी (मेफेड्रोन)
दोन मोबाईल फोन
₹900 रोख रक्कम
इतर जप्त साहित्य
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्रनाथ भंडारे, पोलीस उपनिरीक्षक राहुल सावंत, तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.










