सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात गेल्या 20 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहेत. ऐन वाढीच्या टप्प्यातच पावसाची दडी मारल्यामुळे शेतातील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, तूर आणि मका ही पिके डोळ्यांसमोर करपून गेली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने परिसरातील बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.
पिकांची झालेली दयनीय अवस्था आणि बसलेला मोठा आर्थिक फटका पाहून कासेगाव येथील शेतकरी संभाजी गाजरे यांनी अत्यंत उद्विग्न मानसिकतेत एक मोठे पाऊल उचलले. आपल्या दोन एकरांतील पूर्णपणे करपलेल्या उडीद पिकावर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर फिरवून उभे पीक मातीआड केले.संभाजी गाजरे यांनी हंगामाच्या सुरुवातीला बियाणे, खते आणि औषध फवारणीसाठी प्रतिऐकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च केले होते. वेळेवर पाऊस झाला असता, तर सर्व खर्च वजा जाऊन त्यांना प्रतिऐकरी सुमारे 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, निसर्गाच्या या अवकृपेमुळे त्यांचे सर्व भांडवल मातीमोल झाले आहे. सणासुदीत मुलांना कपडे शाळेचा खर्च व बँकेचे हप्ते कसे भरायचं हा प्रश्न आता शेतकरी संभाजी गाजरे यांना पडला आहे.
आपली व्यथा मांडताना संभाजी गाजरे म्हणाले, “शेतातील पिके जळून खाक झाली असून हातात काहीच उरलेले नाही. कृषी व महसूल विभागाने तातडीने पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही.
परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही हीच स्थिती असून, संपूर्ण कासेगाव परिसरात सध्या भीती आणि चिंतेचे ढग पसरले आहेत. त्यामुळे शासनाने विलंब न करता या भागात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून तातडीने मदत करावे अशी मागणी सध्या बळीराजांकडून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.











