सोलापूर महापालिकेतील प्रशासकीय कारभार दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. विविध गंभीर प्रकरणामुळे दहा कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी गेल्या वर्षभरापासून सुरूच आहे. चौकशी अधिकाऱ्यांनाच याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येते. बाललैंगिक प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले उद्यान विभागातील मजूर कल्पेश पाटोळे यांची चौकशी करण्याची जबाबदारी उपायुक्त आशिष लोकरे यांच्यावर होती त्यांची बदली झाल्यानंतर हे प्रकरण असेच लटकले आहे. एक्स-रे काढताना महिलेबरोबर गैरवर्तन केल्याप्रकरणी आरोग्य विभागातील एक्स-रे टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार यांची चौकशी सहाय्यक आयुक्त मनीषा मगर पाच महिन्यापासून करत आहेत. अँटी करप्शन मध्ये अडकलेले मालमत्ता विभागातील चंद्रकांत दोंतुल या लिपिकाची चौकशी गेल्या वर्षभरापासून मुख्य लेखापाल जवळेकर करत आहेत.
एका गुन्ह्यात 48 तासापेक्षा जास्त अटक असलेले रोहन कांबळे या झाडूवाल्याची चौकशी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित करत आहेत. महापालिकेची जागा परस्पर विकल्या प्रकरणी टॅक्स विभागातील वलिसाब शेख यांची चौकशी अतिरिक्त आयुक्त कारंजे वर्षभरापासून करत आहेत. विनापरवाना गैरहजर असल्या प्रकरणी बिगारी प्रभाकर यांची चौकशी जवळेकर वर्षभरात पासून करत आहेत. महाराष्ट्र दिनी एक मे रोजी आयुक्तांच्या भाषणाच्या वेळी घोषणा दिल्या प्रकरणी आरोग्य निरीक्षक शेषराव शिरसाट यांची देखील चौकशी वर्षभरापासून अतिरिक्त आयुक्त कारंजे करत आहेत. मेडिकल बिल चुकीच्या पद्धतीने दिल्या प्रकरणी राहुल नागमोती, खात्री न करता गुरे , मालकाच्या ताब्यात दिल्याप्रकरणी मंडईतील राजेंद्र बाबरे, तसेच युसीडी विभागातील गणेश कोळी यांचीही चौकशी सुरू आहे. एकूणच अनेक गैरप्रकरणा बाबत ते कर्मचारी ताट मानेने महापालिकेत कार्यरत असताना चौकशी अधिकारी मात्र आपल्या कर्तव्यात कसूर करीत असल्याचे दिसते.









