मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे ‘एआय इन ॲग्रीकल्चर’ संदर्भात बैठक पार पडली.
कृषी विभागाने राज्यातील शेतीचे उत्पादन वाढण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, उपग्रह तंत्रज्ञान, ड्रोन, आयओटी सेन्सर्स आणि डेटा ॲनालिटिक्सवर आधारित अभ्यास करावा. कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, संत्रे, हळद, कांदा व मका या पिकांसाठी ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प महाराष्ट्रात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यासाठी पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, हवामान बदल, पाणीटंचाई, जमिनीची घटती सुपीकता, कीड व रोगांचा वाढता प्रादुर्भाव, वाढता उत्पादन खर्च या आव्हानांवर मात करण्यासाठी बारामती येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने ‘शेती क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स व ‘डिजिटल ट्विन लर्निंग’ प्रकल्प विकसित केला आहे. ट्रस्टने प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात निवडक पिके व निवडक शेतकऱ्यांचा अभ्यास करून हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर पुढील टप्प्यात राज्यात मोठ्या प्रमाणावर अंमलबजावणी करण्यासाठी कार्यवाही करावी. या प्रकल्पाचा विभागनिहाय, पिकवार अभ्यास करावा. पिकांची वाढ, पाण्याची गरज, जमिनीतील ओलावा, हवामान, कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि संभाव्य उत्पादन याबाबत विविध स्रोतांमधून माहिती संकलित करून एकत्रित सक्षम डिजिटल प्रणाली तयार करावी. मिळणाऱ्या माहितीचे मशीन लर्निंगच्या माध्यमातून विश्लेषण करून शेतकऱ्यांना पीकनिहाय आणि शेतनिहाय सल्ला देण्याची गरज असून, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.
‘एआय’ आधारित सिंचन व्यवस्थापनामुळे पाण्याचा वापर कमी करावा. पिकासाठी या मॉडेलद्वारे पिकाचा उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मॉडेल विकसित करावे. शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पन्न वाढून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.
यावेळी मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.











