जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांच्या सन्मान सोहळा
फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे एक संवेदनशील पत्रकार असतो : इंद्रजित पवार
सोलापूर : छायाचित्रकारांनी टिपलेल्या छायाचित्रांमधून एखाद्या परिसरातील विकासाचा पूर्वीचा आणि आताचा बदल नागरिकांच्या नजरेसमोर प्रभावीपणे मांडता येतो. छायाचित्रांमुळे हा बदल लोकांच्या स्मरणात कायम राहतो आणि त्याचा मोठा फायदा होतो, असे प्रतिपादन महापौर विनायक कोंड्याल यांनी केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि एस. पी. सिक्युरिटी सर्विसेस यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक फोटोग्राफर दिनानिमित्त छायाचित्रकार व कॅमेरामन यांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर कोंड्याल बोलत होते. विचारमंचावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार, वै. वा. ह.भ.प. धोंडोपंत दादा यांच्या भजनी सांप्रदायिक फडाचे अध्यक्ष नारायण सुरवसे, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे, फोटोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष संदीप वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन छायाचित्रकारांचा सन्मान करण्यात आला.
महापौर कोंड्याल म्हणाले, जगात घडणाऱ्या घटना आणि त्यामधील सातत्य समाजासमोर आणण्याचे काम पत्रकारिता करते. त्याचप्रमाणे छायाचित्रकार आपल्या कॅमेऱ्यातून या घटना आणि क्षण कायमस्वरूपी जतन करतात. त्यामुळे पत्रकारितेसोबत छायाचित्रकारांचेही महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या राजकीय प्रवासातील अनुभव सांगताना कोंड्याल म्हणाले की, २००७ मध्ये अपक्ष म्हणून निवडून आल्यानंतर आपल्या प्रभागात मोठ्या प्रमाणावर विकासकामे करण्यात आली. त्यावेळी छायाचित्रकारांनी टिपलेली प्रभागाची जुनी छायाचित्रे २०१२ च्या निवडणुकीत नागरिकांना दाखवून पूर्वीचा आणि नंतरचा बदल समोर ठेवता आला. फोटोमधील हा फरक नागरिकांच्या स्मरणात ठसला आणि त्याचा मला दुसऱ्यांदा निवडून येताना फायदा झाला, असे त्यांनी सांगितले.छायाचित्रकार हे इतिहासाचे साक्षीदार असून, त्यांनी टिपलेला प्रत्येक महत्त्वाचा क्षण पुढील पिढ्यांसाठी मौल्यवान ठरतो, असे कोंड्याल यांनी नमूद केले.
प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन लखन आदाटे यांनी केले. सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी विविध वृत्तपत्र, वृत्तवाहिनींचे छायाचित्रकार आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छायाचित्र व्यक्तींचे कार्य, इतिहास
जिवंत ठेवते : इंद्रजीत पवार
जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी जुन्या छायाचित्राचे महत्त्व सांगताना एका ऐतिहासिक पुतळ्याच्या उद्घाटनाची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी छायाचित्राचा उपयोग झाल्याचा अनुभव सांगितला. माणूस काळाच्या पडद्याआड गेला तरी छायाचित्र त्याचे कार्य आणि इतिहास जिवंत ठेवते. फोटोग्राफरच्या कॅमेऱ्यामागे एक संवेदनशील पत्रकार दडलेला असतो, असे ते म्हणाले.
छायाचित्रकार हा इतिहासाचा
साक्षीदार : नारायण सुरवसे
नारायण सुरवसे म्हणाले, छायाचित्रकाराचे काम ‘दृश्य, द्रष्टा आणि दर्शक’ या त्रिपुटीशी जोडले. एआयच्या युगात मूळ आणि बदललेले छायाचित्र ओळखणे हे मोठे आव्हान असून, सत्यता व विश्वासार्हता जपण्याची जबाबदारी छायाचित्रकारांची आहे. छायाचित्रकार हा क्षण टिपतो. इतिहासाचा साक्षीदार बनतो.











