सोलापूर शहरात 9 ठिकाणी बीओटी कॉम्प्लेक्स बांधण्याचा प्रस्ताव आयुक्तांनी सभेपुढे मंजुरीसाठी पाठवला होता. याबाबत महाविकास आघाडीने तसेच काही संघटनांनी विरोध केल्यामुळे या नऊपैकी सात रस्ता येथील बस डेपो ची एक आणि नव्या पेठेतील बैल गोटा शॉपिंग सेंटर अशा दोनच जागांना आजच्या सभेत मंजुरी देणार असल्याचे महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितले. जागतिक बँकेच्या सहकार्याने सोलापूर शहरात 1378 कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवली जाणार असून त्यासाठी महापालिकेला साडेतीनशे रुपये स्व:हिस्सा भरावा लागणार आहे. त्यामुळे शासनाने सुचविलेल्या केपीएमजी या एजन्सी मार्फत सोलापूर शहरातील महापालिकेच्या मोकळ्या जागांचा सर्वे करणे, तसेच त्यातून किती निधी उभा राहू शकतो याचा अभ्यास करणे हे काम सुरू झाले आहे. एकूण 28 जागांचा या एजन्सीने अभ्यास केला असून त्यातील सात जागांचा रिपोर्ट मनपाकडे पाठवला आहे. अगोदरच्या बीओटी कॉम्प्लेक्स चा पदाधिकाऱ्यांनी अभ्यास केला नाही. त्यातून महापालिकेला किती उत्पन्न मिळाले याची माहिती नाही. शिवाय पारदर्शकतेचा अभाव यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले आहे. यावरूनच आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. आज सायंकाळी साडेचार वाजता महापालिकेची सभा आयोजित केली आहे. काल महापौरांनी याबाबत तातडीची पत्रकार परिषद घेऊन पक्षाची भूमिका मांडली. त्यामुळे आज सभेपूर्वी पुन्हा बीओटी कॉम्प्लेक्स किती महत्त्वाचे आहेत याचा पाढा प्रशासन तसेच सत्ताधाऱ्याकडून वाचला जाणार आहे. तर विरोधक याबाबत खिंडीत पकडून राडा करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आजच्या महापालिका बोर्डाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.








