सोलापूर शहरातील होटगी रोडवर महिला हॉस्पिटल ते विमानतळ आणि पुढे जेऊर कडे जाणारा 29 किलोमीटरचा रस्ता चांगलाच गाजू लागला आहे. सोलापूर महापालिकेच्या हद्दीत या रस्त्याची लांबी सुमारे पाच ते सहा किलोमीटर असून विविध अशा 12 ठिकाणी जलवाहिनी आणि ड्रेनेज लाईन रस्ता खोदून टाकावी लागणार आहे. यासाठी सुमारे 9 ते 10 कोटी रुपयांचा खर्च येणार असून हा खर्च महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी ने करावा अशी मागणी महापालिकेची आहे. वास्तविक पाहता शहरातील या रस्त्याचे सुमारे 70 टक्के काम झाली आहे.
महापालिका आयुक्त, नगर अभियंता, ड्रेनेज तसेच पाणीपुरवठ्याचे प्रमुख अधिकाऱ्यांना याची पूर्वकल्पना होती. असे असताना शहरातील काम पूर्णत्वाकडे जाताना आता महापालिका अधिकाऱ्यांना जाग आली आहे. वास्तविक पाहता शहर हद्दीतील कोणताही रस्ता करताना महापालिकेची एनओसी घ्यावी लागते. ती एनओसी रस्ते विभागाने दिली कशी, आणि आणि रस्ता होईपर्यंत हे अधिकारी झोपा काढत होते का असा संतप्त सवाल त्रस्त झालेले या भागातील नागरिक करत आहेत. हेच काम अधिकाऱ्यांनी दोन महिन्यापूर्वी केले असते तर नवा केलेला रस्ता बारा-पंधरा ठिकाणी फोडावा लागला नसता. आता आयुक्तांनी याबाबत सर्व अधिकार महापौरांना दिले आहेत मात्र महापौरांना प्रशासकीय अधिकार नाहीत त्यामुळे आयुक्त आणि महापौर यांच्यात टोलवाटोलवी सुरू असल्यामुळे नागरिकांना याचा त्रास होणार आहे.





