आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात धडक कारवाई सुरु केली आहे. राज्यभरात १,४०० हून अधिक ठिकाणी मोठी तपासणी आणि धाडी टाकण्यात आल्या आहेत .मुंबई उच्च न्यायालय व मंत्रालयाच्या कॅन्टीनचीही पाहणी करत विनापरवाना चालणाऱ्या कॅन्टीनवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. मोठ्या प्रमाणावर अन्नसाठा जप्त करत नियम न पाळणाऱ्या शेकडो आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.आता बीड जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने बनावट आणि बेकायदा खाद्यतेल रिपॅकिंग करणाऱ्या माफियांविरोधात एक मोठी कारवाई केली आहे. यामध्ये परिसरातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून प्रशासनाने तब्बल 1 कोटी 94 लाख 50 हजार 922 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या धडक कारवाईने जिल्हाभरात एकच खळबळ उडाली आहे.आता त्यांच्या निशाण्यावर चायनीज फूड आणि फूड डिलिव्हरी ॲप असून लवकरच मोठ्या नामांकित कंपन्यांचे परवाने रद्द केले जाणार असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.




