मराठा समाजाची कुणबी प्रमाणपत्रे रद्द करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत पुन्हा एकदा राज्य सरकारवर, विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “सत्तेचा गैरवापर करून मराठ्यांची कुणबी प्रमाणपत्रे जाणीवपूर्वक रद्द केली जात आहेत. मात्र, फडणवीसांचे आता सर्व डाव संपले असून, आता माझा डाव सुरू होईल,” असा उघड इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. सोलापूरच्या शिवाजी चौकात जरांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर जिल्ह्यातील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जरांगे यांनी काही कागदोपत्री पुरावेही माध्यमांसमोर सादर केले.
आगामी आंदोलनाची हाक देताना जरांगे म्हणाले, “राजकारण्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. त्यांना वाटते की आम्ही सत्तेत आहोत, बहुमतात आहोत, त्यामुळे आमचे कोणी काहीही करू शकत नाही. पण 29 ऑगस्ट रोजी मराठा समाज आपली ताकद दाखवून देईल. मी सर्व मराठा बांधवांना आवाहन करतो की, 29 ऑगस्टला एकही मराठा घरी बसता कामा नये. आपल्या सर्व गाड्या घेऊन अंतरवाली सराटीकडे निघा. मराठ्यांच्या लेकरांच्या हक्काचे हे पक्के आरक्षण आहे, ते मिळवल्याशिवाय आपण गप्प बसायचे नाही.






