सोलापूर : मोहरम पर्वाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची जोरदार चर्चा सुरू असून, गेल्या तब्बल वीस वर्षांपासून ही भव्य मिरवणूक शहराच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचे वैशिष्ट्य ठरत आहे. दरवर्षी हजारो भाविक आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत निघणारी ही मिरवणूक यंदाही जल्लोषात पार पडली.
शनिवार पेठेतील भारती चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ होऊन बारा इमाम चौक, विजापूर वेस, माणिक चौक आणि हाजीमाई चौक मार्गे आसार मैदान येथे आगमन होते. आसार मैदान हे सोलापूर शहरातील सर्व पंजांच्या ऐतिहासिक मिलापाचे एकमेव ठिकाण मानले जाते. येथे सर्व पंजांचा मिलाप झाल्यानंतर मिरवणूक पुन्हा शनिवार पेठेतील मूळ ठिकाणी परतते.
या भव्य सोहळ्यात तरुणांचा जोशपूर्ण पारंपरिक नृत्याविष्कार, ढोल-ताशांचा दणदणाट, आकर्षक विद्युत रोषणाई, जंगी ढाल, पारंपरिक पोशाख यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून जातो. यासोबतच भाविकांसाठी खाऊ वाटप आणि अन्नदानाचेही आयोजन करण्यात येते, त्यामुळे धार्मिक श्रद्धेसह सामाजिक बांधिलकीचाही संदेश दिला जातो.
“गेल्या वीस वर्षांपासून ही परंपरा अखंडपणे सुरू असून, सर्व समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि सहकार्य लाभत आहे. मोहरमच्या निमित्ताने बंधुता, एकता आणि सेवाभावाचा संदेश देण्याचा आमचा प्रयत्न असतो,” अशी माहिती संस्थापक अध्यक्ष इस्माईल कुरेशी यांनी दिली.












