दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथे असलेल्या गोकुळ शुगरचे अनेक कारनामे दिवसेंदिवस उघड होत आहे. सुमारे 130 कोटी रुपये एफआरपी थकवल्याप्रकरणी 34 गावातील शेतकऱ्यांनी गेल्या सात दिवसापासून सोलापूर झेडपी समोर गोकुळ शुगरच्या विरोधात दिवस-रात्र आंदोलन सुरू केले आहे. दुसरीकडे साखर आयुक्तांकडून गोकुळ शुगर च्या सर्व मालमत्ता वर आरसी ची म्हणजे मालमत्तांच्या जप्तीची कारवाई सुरू केली आहे. गेल्या दोन वर्षापासून सुमारे दीडशे कोटी रुपये याच गोकुळ शुगरने विविध बँकांचे बुडवले आहेत. गोकुळ शुगर च्या शिंदे कुटुंबीयांच्या सर्व मालमत्ता विविध बँकेंनी जप्त केले आहेत. त्यातच कमी म्हणून की काय आता याच गोकुळ शुगर ने चेन्नईमधील इआयडी पॅरी इंडिया लिमिटेड या कंपनीला मोलॅसिस न देता त्यांना १५ कोटी ७२ लाखांचा चुना लावला आहे. याप्रकरणी सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस ठाण्यात काल गोकुळ शुगरचे गणेश दत्ता शिंदे, विशाल गणपत शिंदे, दत्ता बलभीम शिंदे,कपिल बलभीम शिंदे या चौघां विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











