सोलापूर महापालिकेत जागतिक बँकेच्या सहकार्याने होणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचा 1378 कोटी रुपयांचा प्रस्ताव चांगलाच गाजू लागला आहे. सोमवारी होणाऱ्या मनपा सभेत हा प्रस्ताव निर्णयासाठी प्रशासनाने पाठवला आहे. या योजनेसाठी महापालिकेला 341 कोटी रुपयांचे मॅचिंग कॉन्ट्रीब्युशन भरावे लागणार आहे. यावरून टॅक्स वाढणार अशी चर्चा सुरू झाली होती. याबाबत आयुक्तांना जाब विचारण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख महापालिकेत सायंकाळी पाच वाजता येणार आहे हे समजल्यामुळे दुपारी तीन वाजताच महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर,स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, पक्षनेते नरेंद्र काळे उपमहापौर यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणतीही करवाड करणार नाही असे स्पष्टपणे सांगितले. महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी पर्यायी मार्गाचा शोध घेऊ असे पक्षनेते नरेंद्र काळे म्हणाले. याच विषयावरून आमदार देवेंद्र कोठे विरुद्ध दोन्ही देशमुख आमदार अशी गटबाजी झाली आहे. सायंकाळी पाच वाजता दोनही आमदार आणि त्यांच्या गटाचे नगरसेवक आयुक्तांच्या कार्यालयात आले होते. यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी आयुक्तांना चांगलेच धारेवर धरले. कुणाला समजू नये म्हणून इंग्रजीमध्ये प्रस्ताव पाठवला का… तुम्ही आम्हाला विश्वासात का घेत नाही… कुणाच्या दबावाखाली काम करता का… 30 टक्के लोक टॅक्स भरत नाहीत त्यांच्याकडे कोण लक्ष देणार असे अनेक प्रश्न विचारले. टॅक्स कोणताही वाढणार नाही मात्र याबाबत जो निर्णय आहे तो महापालिका सभागृहांनी घ्यावा अशी सर्वसाधारण आयुक्तांनी केली.
