पश्चिम विभागीय व राष्ट्रीय युवा महोत्सवातील विद्यार्थी कलावंतांचा सत्कार!
सोलापूर- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थी कलावंतांनी राज्यस्तरीय ‘इंद्रधनुष्य’, पश्चिम विभागीय तसेच राष्ट्रीय युवा महोत्सवात उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वामुळे सोलापूर विद्यापीठाचे नाव निश्चितच देशपातळीवर उज्वल होईल, असा विश्वास ज्येष्ठ नाट्यकलावंत व परीक्षक डॉ. संभाजी भोसले यांनी व्यक्त केला.
विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे ‘लोकभवन’ आयोजित इंद्रधनुष्य युवा महोत्सव तसेच अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ, दिल्ली यांच्या वतीने आयोजित पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी व यशस्वी ठरलेल्या विद्यार्थी कलावंतांचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी डॉ. भोसले हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे यांनी प्रास्ताविक व स्वागत करताना यंदाच्या वर्षी तब्बल २५ पारितोषिकांची कमाई झाल्याची माहिती दिली. विद्यापीठाच्या इतिहासातील हे उल्लेखनीय यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
डॉ. भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करत, “एका जिल्ह्यातील विद्यापीठ असूनही राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणे ही अभिमानास्पद बाब आहे,” असे गौरवोद्गार काढले. या विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य लाभेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. महानवर यांनी विद्यार्थी कलावंतांनी विद्यापीठाचे नाव उंचावल्याबद्दल अभिमान व्यक्त केला. “इंद्रधनुष्य, पश्चिम विभागीय आणि राष्ट्रीय युवा महोत्सवातील यश ही विद्यार्थ्यांच्या मेहनतीची पावती आहे. त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ कटिबद्ध आहे,” असे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी जैद शेख व आदिती सरदेशमुख यांनी मनोगत व्यक्त करताना महोत्सवातील अनुभव समृद्ध करणारा ठरल्याचे सांगितले. “या प्रवासात विद्यापीठाचे मिळालेले पाठबळ आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले,” असे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले.

