सोलापूर – राष्ट्रीय खाद्य तेल अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे दिनांक 23 ते 25 मार्च 2026 रोजी हुतात्मा स्मृती मंदीर सोलापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. सदर महोत्सवामध्ये विविध धान्य व खाद्य पदार्थांचे एकूण 50 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून सेंद्रीय गुळ, काकवी, इंद्रायणी तांदूळ, मंगळवेढा ज्वारी, सोलापूरी हुरडा व जांभुळ कुल्फी, ज्वारी बिस्किटे, केळी व शेवगा पावडर, मध, वाळवण पदार्थ, ड्रायड भाजीपाला, मल्टीमिलेट आटा, कडक भाकरी असे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालापासून प्रक्रिया केलेले विविध पदार्थ ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विविध तज्ञांचे चर्चासत्र/ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अन्नप्रक्रिया उद्योगाचे विक्री व्यवस्थापन व विपणन याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. महोत्सवामध्ये विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक व खरेदीदार यांना एकाच मंचावर आणून त्यांच्यामध्ये वार्षिक करार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वविध अन्नधान्य उत्पादनांचे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होईल असे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजक यांनी धान्य महोत्सवास भेट द्यावी. तसेच चर्चासत्रामध्ये दिल्या जाणाऱ्या कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

