मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने शनिवारी दुपारी सोलापूर शहराचा दौरा केला. सव्वा एक वाजता ते सभास्थळी येथील असे अपेक्षित होते मात्र एक तास ते लेट आले. प्रारंभी सिद्धेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. देवस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन त्यांच्या हस्ते करण्यात आले. दोन वाजता बाराबंदी वेशभूषेमध्ये त्यांचे सभास्थळी आगमन झाले. सिद्धेश्वर महाराजांच्या घोषणा देऊन त्यांनी भाषणाला सुरुवात केली. स्मार्ट सिटी योजना, विमानसेवा, आयटी पार्क, सुरत चेन्नई कॉरिडॉर.. लाडकी बहीण योजना आदी बाबींचा ओझरता उल्लेख करत त्यांनी वीस मिनिटात आपले भाषण संपविले. आम्ही विमान सेवा सुरू करून दाखविली आता नाईटलांडिंग सेवा सुरू करू तसेच आयटी साठी जागा निश्चित झाली असून लवकरच त्या ठिकाणी आयटी पार्क उभारेल. 872 कोटींचे टेंडर देखील आम्ही काढले असून सोलापूरकरांना आम्ही दररोज पाणीपुरवठा करू त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.

