विरोधी पक्षातील तुल्यबळ अनेक जण भाजपमध्ये जाऊ लागले आहेत. त्यामुळे भाजपची गाडी ‘हाउसफुल’ भरली आहे. यामुळे प्रत्येकाला तिकीट मिळणार नसल्यामुळे अनेक जण नाराज होणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसचा डोळा बंडखोरांवर असणार आहे. आज पासून नगरपालिकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. पुढील महिनाभरात जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्ष.. मग तो महायुती असो किंवा महाविकास आघाडी स्वबळाची भाषा करीत असला तरीही त्यांना उमेदवार मिळणे अवघड आहे. ज्यांना तिकीट मिळणार नाही ते साहजिकच बंडखोरी करणार आणि विरोधी पक्ष बंडखोरावर स्वार होणार हे नक्की. सोलापूर सह पुणे मुंबई आणि एकूणच राज्यभरातील जिल्हा परिषद महापालिका तसेच हीच परिस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तीन महिने राज्यात सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय कुस्त्यांचा फड रंगणार आहे हे नक्की.

