प्रथमच मिळाली पाच पारितोषिके!
सोलापूर, दि. 7- अखिल भारतीय विश्वविद्यालय संघ, नवी दिल्ली अंतर्गत ३८ वा राष्ट्रीय आंतरविद्यापीठीय युवा महोत्सव अमिटी विद्यापीठ, नोएडा येथे पार पडला. देशातील आठ विभागातून जिंकलेल्या १२२ विद्यापीठाचे प्रथम, व्दितीय, तृतीय क्रमांक प्राप्त संघ या राष्ट्रीय महोत्सवात सहभागी झाले होते. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पहिल्यांदा पाच पारितोषिके मिळवत इतिहास रचला आहे.
गेल्या वीस वर्षातील विद्यापीठाच्या इतिहासातील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. राष्ट्रीय पातळीवरील ही स्पर्धा अत्यंत चुरशीची असते.nया महोत्सवात सोलापूर विद्यापीठाच्या संघाने उत्तम कामगिरी केली आहे. देशपातळीवर कलाक्षेत्रात विद्यापीठाचे नाव ठळक करत इतिहास रचला आहे. एकूण पाच पारितोषेके मिळवत नेत्रदिपक यश मिळवले आहे. या महोत्सवात पुढील पारितोषिके प्राप्त झाली आहे. मिमिक्री-तृतीय क्रमांक -जैद शेख, पोस्टर- व्दितीय क्रमांक-निसर्ग लोहार, कार्टुनिंग- तृतीय क्रमांक- निसर्ग लोहार, एकांकिका-प्रथम क्रमांक (सामुहिक) आणि शोभायात्रा-प्रथम क्रमांक (सामुहिक).
विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच इतकी पारितोषिके प्राप्त झाली आहेत. यापुर्वी राष्ट्रीय युवा महोत्सवात कोणताही सामुहिक कलाप्रकार जिंकलेला नव्हता व कधी एकाच वेळी इतकी पारितोषिके मिळालेली नव्हती. युवा महोत्सवात विद्यापीठाने मिळवलेले हे यश ऐतिहासिक आहे. या यशाबद्दल कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे यांनी अभिनंदन केले. या यशात संघप्रमुख, प्रशिक्षक आणि विद्यार्थ्यी तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॅा. केदारनाथ काळवणे यांचा मोलाचा वाटा आहे. मागील सर्व युवा महोत्सवाची तयारी त्यांनी नेमकी आणि गुणवत्तेला महत्त्व देऊन केल्याने हे यश मिळते आहे. त्यासोबतच प्रतिवर्षी होणाऱ्या आंतरमहाविद्यालयीन “उन्मेष सृजनरंगांचा” या युवा महोत्सवाच्या परीक्षणासाठी त्या-त्या कलाप्रकाराचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील तज्ज्ञ परीक्षकांना निमंत्रित करून पारदर्शक निकाल लागल्याने राज्य, विभागीय आणि आता राष्ट्रीय पातळीवरील सोलापूर विद्यापीठाची युवा महोत्सवातील कामगिरी उंचावली आहे.











