सोलापूर: प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने येत्या १५ आणि १६ फेब्रुवारी २०२० रोजी ‘प्रिसिजन संगीत महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचे यंदा सहावे वर्ष असून तो शिवछत्रपती रंगभवन येथे पार पडेल, अशी माहिती प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शनिवार दि. १५ फेब्रुवारी रोजी प्रथम सत्रात डॉ. अबोली सुलाखे (सरोद) व अपर्णा देवधर (सतार) यांच्यात रंगतदार जुगलबंदी होईल. त्यानंतर दुसर्या सत्रात ‘मेलॉडीक रिदम’ हा अनोखा कार्यक्रम सादर होईल. यामध्ये पद्मश्री विजय घाटे (तबला), मंजुषा पाटील (गायन) व शीतल कोळवलकर (कथक) हे फ्यूजन सादर करतील.
महोत्सवाच्या दुसर्या दिवशी रविवार दि. १६ फेब्रुवारी रोजी प्रथम सत्रात सचिन पटवर्धन यांचे स्पॅनिश वीणावादन होणार आहे. मेलॉडीक रिदम व स्पॅनिश वीणावादन यांसारखे शास्त्रीय संगीतातील नवे प्रवाह सोलापूरात पहिल्यांदाच सादर होणार आहेत हे विशेष. रविवारी दुसर्या सत्रात कुमार गंधर्व यांच्या कन्या तथा ख्यातनाम शास्त्रीय गायिका कलापिनी कोमकली यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
पुण्यातील ‘सवाई गंधर्व’च्या धर्तीवर सोलापूरातही पूर्णपणे शास्त्रीय संगीताला समर्पित महोत्सव सुरू व्हावा अशी मागणी सोलापूरातील रसिकश्रोत्यांकडून केली जात होती. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून प्रिसिजन फाउंडेशनकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या वर्षीही सोलापूरकरांना या महोत्सवाचा आनंद निःशुल्क घेता येईल.
महोत्सवासाठी निःशुल्क प्रवेशिका (फ्री पासेस) आहेत. ते सोमवार दि. १० फेब्रुवारीपासून प्रिती केटरर्स (एम्प्लॉयमेंट चौक), एस के कॉम्प्युटर्स (दत्त चौक), कमला नेहरू प्रशाला (जुळे सोलापूर), विद्या कॉम्प्युटर्स (जुळे सोलापूर), कॉटनकिंग (सरस्वती चौक) या ठिकाणी उपलब्ध होतील. ‘प्रिसिजन गप्पा’प्रमाणेच हा महोत्सवही सर्वांसाठी खुला असेल. प्रिसिजनच्या प्रथेप्रमाणे दोन्ही दिवस सायंकाळी ठीक ६.२५ वाजता कार्यक्रम सुरू होईल.
कलावंत आणि साथीदार
डॉ. अबोली सुलाखे (सरोद) व अपर्णा देवधर (सतार), गणेश तानवडे (तबला साथ). पद्मश्री विजय घाटे (तबला), मंजुषा पाटील (गायन) व शीतल कोळवलकर (कथक), तन्मय देवचक्के (हार्मोनियम साथ). सचिन पटवर्धन (स्पॅनिश वीणा), रोहित मुजुमदार (तबला साथ). कलापिनी कोमकली (गायन), तेजोवृष जोशी (तबला साथ) व निरंजन लेले (हार्मोनियम साथ).