येस न्युज नेटवर्क : कतारमध्ये खेळवण्यात येणारा FIFA विश्वचषक 2022 त्याच्या समारोपाच्या दिशेने वाटचाल करत आहे. उद्यापासून स्पर्धेच्या सेमीफायनल्सला सुरुवात होणार आहे. अर्जेंटिना, क्रोएशिया, मोरोक्को आणि फ्रान्स या चार संघांनी सेमिफायनल्समध्ये धडक दिली आहे. तर उर्वरित 28 संघांनी आपल्या सामानाची आवराआवर करुन घरची वाट धरली आहे. सेमीफायनल्सच्या पहिल्या सामन्यात अर्जेंटिना आणि क्रोएशिया यांच्यात लढत होणार आहे. तर सेमिफायनल्सच्या दुसऱ्या सामन्यात मोरोक्को आणि फ्रान्स आमनेसामने असतील. तसेच, यंदाच्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना 18 डिसेंबर रोजी होणार आहे.
फिफा सुरू होण्याआधीपासूनच काही दिग्गज फुटबॉलर्सबद्दल बरीच चर्चा रंगली होती. या खेळाडूंमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, केलियन एमबाप्पे, हॅरी केन, रॉबर्ट लेवांडोस्की आणि नेमार ज्युनियर यांचा समावेश होता. आता सेमीफायनल्समध्ये चॅम्पियन बनण्याच्या शर्यतीत यापैकी फक्त लिओनेल मेस्सी आणि कायलियन एमबाप्पे उरले आहेत. केन, रोनाल्डो, नेमार आणि लेवांडोस्की या उर्वरित तीन खेळाडूंचे संघ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.