येस न्युज नेटवर्क : आज गुढीपाडवा आहे. राज्यात सर्वत्र उत्साहात हा सण साजरा केला जात आहे. कोरोनाच्या संकटामुळं गेल्या दोन वर्षात गुढीपाडवा साजरा करण्यात आला नव्हता. यावर्षी मात्र, कोरोनाचा धोका कमी झाल्यामुळं मोठ्या उत्साहात गुढीपाडवा साजरा केला जात आहे. दरम्यान, गुढीपाडव्यानिमित्त राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक संकल्प केला आहे. जिल्हा परिषदेच्या 60 शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या करण्याचा संकल्प गुढीपाडव्यानिमित्त बच्चू कडू यांनी केला आहे.
पुढील एक वर्षाच्या काळात अचलपूर विधानसभा मतदारसंघातील शाळांचा पुणे येथील वाबळेवाडी शाळेच्या धर्तीवर विकास करण्यात येणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले. या उपक्रमाची सुरुवात बच्चू कडू यांच्या बेलोरा गावातील जिल्हा परिषद शाळेपासून करण्यात आली आहे. आज गुढी पाडव्याच्या निमित्तानं गावातील शाळेची स्वच्छता करुन लोकसहभागातून गुढी उभारण्यात आली. शाळेतील शिक्षकांसह स्वयंसेवकांच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान, आंतरराष्ट्रीय भाषा, संगणक साक्षरता इत्यादी प्रकारच्या भविष्यवेधी शिक्षणाची संधी मुलांना उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. तसेच येणाऱ्या काळात मराठी, हिंदी या भाषांसोबतच स्पोकन इंग्लिश, जापनीज या अंतरराष्ट्रीय भाषांवर विद्यार्थ्यांनी प्रभुत्व मिळविवावे यासाठी देखील प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी बच्चू कडू यांनी सांगितले.