येस न्युज मराठी नेटवर्क : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. ‘अनाथांची माय’ असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत.
शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख , अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. स्वर्गीय सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.