नवी दिल्ली : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी अचानक राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेतली. ही भेट पंजाब विधानसभेच्या अनुषंगाने असल्याचे सांगितले जात होते . मात्र, या बैठकीत प्रशांत किशोर, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यात २०२४ मधील लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह के.सी. वेणुगोपाल आणि हरिश रावत हे सुद्धा उपस्थित होते. हरिश रावत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री असून, सध्या त्यांच्याकडे पंजाब काँग्रेसचा पदभार देण्यात आलेला आहे. या बैठकीत नेत्यांमध्ये पंजाब विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे राजकीय सल्लागार असलेल्या प्रशांत किशोर यांच्यासोबत पंजाब केंद्रीत चर्चा झाल्याचे वृत्त होते . २०२४ मध्ये भाजपाला पर्याय देण्यासाठी विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्व विरोधी पक्षांमध्ये दुवा साधण्याचे काम सध्या प्रशांत किशोर करत असल्याचे वृत्त आहे.









