नवी दिल्ली: भारताचे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे निधन झाले. आज (१३ जुलै) मंगळवारी त्यांना हृदय विकाराचा धक्का बसला. भारताने १९८३ साली विजेतेपद मिळवलेल्या पहिल्या वर्ल्डकप संघाचे सदस्य होते.
शर्मा हे भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे सदस्य देखील होते.१९८३च्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध विजयाने सुरुवात केली होती. यात शर्मा यांची भूमिका महत्त्वाची होती. ते जेव्हा मैदानावर उतरले तेव्हा भारताची अवस्था ३ बाद ७६ अशी होती. तेव्हा शर्मा यांनी १२० चेंडूत ८९ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेगवान ४० धावा केल्या. तर इंग्लंडविरुद्ध कठीण परिस्थितीत ६१ धावा केल्या. या स्पर्धेत शर्मा यांनी ३४.२८च्या सरासरीने २४० धावा केल्या.शर्मा यांनी भारतीय क्रिकेट संघाकडून ३७ कसोटीत ३३.४५ च्या सरासरीने १ हजार ६०६ धावा केल्या. १४० ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या होती. तर वनडेमध्ये ४२ सामन्यात त्यांनी देशाचे प्रतिनिधत्व केले. वनडेत शर्मा यांनी २८.४८च्या सरासरीने ८८३ धावा केल्या.यशपाल शर्मा हे दिलीप कुमार यांचे मोठे चाहते होते. शर्मा यांच्या क्रिकेट करिअरमध्ये दिलीप कुमार यांचे मोठे योगदान होते.









