सोलापूर : दक्षिण तालुक्यातील वडापूर बॅरेज येथून भीमा सीना जोडकालव्यासाठी पाणी उपलब्धतेचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे, त्याला मान्यता द्यावी, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वडापूर बॅरेज येथून भीमा सीना जोडकालव्यासाठी 0.58 टीएमसी पाणी असून सीना नदीवरील 6 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पुनर्जिवीत होणार आहेत. यासाठी सुमारे 10 हजार हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येणार आहे. याच्या पाणी उपलब्धतेसाठी मुख्य अभियंता, जलविज्ञान नाशिक व कृष्णा खोरे पाणी तंटा लवाद, पुणे यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. ते कृष्णा खोरे विकास मंडळाच्या कार्यकारी संचालकांनी या प्रकल्पासाठी पाणी उपलब्धतेसाठी शासनास सादर केले आहे. हा प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे. याला मान्यता द्यावी, असे आ. देशमुख यांनी निवेदनात म्हटले आहे.