अकलूज / प्रतिनिधी – महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांचे लोकजीवन या विषयावर भटके विमुक्त विकास मंचचे प्रदेशाध्यक्ष तथा जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांच्या शोधनिबंधाचे शुक्रवार दि . २६ फेब्रुवारी रोजी मध्यप्रदेश भोपाळ येथे सादरीकरण होणार आहे .
मध्यप्रदेश भोपाळ येथील शासकीय हमीदिया कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या आदिवासी लोक कला व बोली विकास अकादमीच्या वतीने जनजातीय संग्रहालय , श्यामल हिल्स , भोपाळ येथे शुक्रवार दि . २६ ते रविवार दि २८ फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय शोध निबंध सादरीकरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे . या त्रिदिवसीय कार्यक्रमात पहिल्या दिवशी ” महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांचे लोक जीवन ” या विषयावर जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे हे आपला शोध निबंध सादर करणार आहेत .
महाराष्ट्रातील भटक्या विमुक्तांच्या ५२ जातीजमातीचा अभ्यास करुन सूर्यकांत भिसे यांनी ” भटक्यांची भटकंती ” हे पुस्तक लिहीले आहे . भोपाळ येथील शासकीय हमीदिया कला व वाणिज्य महाविद्यालयाने या पुस्तकाची दखल घेवून या समाजा विषयीचा शोध निबंध सादर करण्यासाठी सूर्यकांत भिसे यांना निमंत्रित केले आहे .