द्वारका : गुजरातमधील द्वारकेत असलेल्या प्रसिद्ध द्वारकाधीश मंदिराच्या ध्वजस्तंभावर वीज पडली. वीज पडतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. वीज पडल्याने मंदिराच्या ध्वजस्तंभाचे नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
जगप्रसिद्ध द्वारकाधीश मंदिरावर मंगळवारी वीज पडल्याची घटना घडली. वीज कोसळतानाचा व्हिडीओ समोर आला असून, तो व्हायरलही झाला आहे. मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. वीज पडल्याने मंदिराच्या ५२ फूट उंच ध्वजस्तंभाचे नुकसान झाले आहे. तर भिंती काळ्या पडल्या आहेत. मात्र, मंदिराचे कोणतंही नुकसान झालेले नाही. वीज पडल्याच्या घटनेनंतर द्वारकेचे उपजिल्हाधिकारी निहार भेटारिया यांनी घटनेनंतर लगेच मंदिराला भेट दिली आणि परिसराची पाहणी केली. पाहणी करण्यात आल्यानंतर मंदिरातील दैनंदिन कार्यक्रम संथगतीने सुरू करण्यात आले.









