लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 साठी काँग्रेसने 41 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्या 16 महिला उमेदवार आहेत. यापूर्वी काँग्रेसने 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. त्यात 50 महिला उमेदवारांचा समावेश आहे. ही यादी जाहीर करताना काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी 40 टक्के महिला आणि 40 टक्के तरुणांचा समावेश असेल असा निर्धार केला होता. त्यानुसार काँग्रेसने हाजी अखलाक यांना कैराना येथून तिकीट दिले आहे. सोबतच मेरठमधून रंजन शर्मा, आगरा कैंटमधून सिकंदर वाल्मीकि आणि मांट येथून सुमन चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
उन्नाव पीडितेच्या आईला तिकीट
उन्नाव बलात्कार प्रकरण देशभर गाजले. या प्रकरणातील पीडितेच्या आईला काँग्रेसने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे तिकीट दिले आहे. तर मोठ्या नावांमध्ये सलमान खुर्शीद यांच्या पत्नी लुईस खुर्शीद यांनाही तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेस प्रदेश अध्यक्ष लल्लू आणि प्रतापगढच्या रामपूरखास जागेवरून आराधना मिश्रा मोना यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच सदफ जाफर यांनाही तिकीट देण्यात आले आहे. तर उन्नाव येथून आशा सिंह या उमेदवार राहणार आहेत.

