सोलापूर : मुलांमध्ये मोबाईलचे फॅड इतके वाढले आहे की ते मोबाईल शिवाय जगूच शकत नाहीत.पालकांनी मोबाईल दिला नाही म्हणून राग अनावर झालेल्या आठवीत शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दिव्या सुरेश कोठारे असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव असून नागपूर जिल्ह्यातील कापरखेडा जवळील चणकापुरातील जय भोले नगर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली.दिव्या ही महात्मा फुले शाळेत आठवीत शिकत होती. दिव्या तिच्या आत्याच्या मुलीचे लग्न असल्याने शुक्रवारी आई-वडिलांसह आत्याच्या घरी कार्यक्रम साठी गेली होती.आत्याचे घर तिच्या घरापासून काही अंतरावरच होते. दिव्याने संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मोबाईल मागितला, परंतु मोबाईल न दिल्याने दिव्या नाराज झाली. रागाच्या भरात आत्याच्या घरातून निघून सरळ तिने आपले घर गाठले. घरात कोणीच नव्हते. घरात बांधलेल्या पाळण्याच्या दोरीला तिने गळफास घेतला. काही वेळाने त्याची मोठी बहीण तिला शोधत घरी आली असता हा प्रकार उघडकीस आला.
तिला इंस्टाग्राम आणि व्हाॅटसॲप यांसारखी सोशल मीडिया ॲप नियमित वापरण्याची सवय होती. मोबाईलच्या अतिवापराने तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत होते, असे तिच्या काकांनी यावेळी सांगितले.तिच्या या आत्महत्याने विद्यार्थी आणि तरुण वर्ग सोशल मीडियाच्या किती आहारी गेला आहे हे दिसून येते.

