येस न्यूज मराठी: विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा आमदार अभिजीत पाटील यांनी १६ जानेवारीपासून ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या घोषणेमुळे आता एक वेगळाच प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून अनेक भागांत शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवत आहे. पाण्याअभावी ऊसपिके जळण्याच्या मार्गावर आहेत, तर काही शेतकऱ्यांना टँकरने पाणी विकत घेऊन ऊस वाचवण्याची वेळ आली आहे.
अशा परिस्थितीत जानेवारी महिन्यापर्यंत कारखान्याला गाळपासाठी पुरेसा ऊस उपलब्ध राहणार का? पाण्याअभावी सध्या ऊसपिकांची अवस्था बिकट असताना जानेवारीतील उसाला ३५०० रुपये दर जाहीर करण्यामागचे गणित काय, असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. कारण, शेतकऱ्यांसाठी केवळ ऊसदर महत्त्वाचा नाही, तर शेतात ऊस उभा राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान, कारखान्याच्या या घोषणेवर काही शेतकऱ्यांनी उपरोधिक टीकाही केली आहे. “जानेवारीमध्ये कारखान्यात ऊसाऐवजी दगड गाळणार का?” असा सवाल उपस्थित केला जात आहे.











