मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पाायाखालची जमीन सरकली आहे, असे सांगतानाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून पाळत ठेवली जात असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. त्यामुळे आघाडीत विसंवाद असून मविआ सरकारमध्ये अविश्वासाचे वातावरण असल्याचे स्पष्ट होते , असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.
प्रवीण दरेकर यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना हा दावा केला आहे. आघाडी तोडायला कोणीही गेलं नाही. तेच एकमेकांवर आरोप करत आहेत. दुसरीकडे एकत्र असल्याचा कांगावाही करत आहेत. संपूर्ण कोव्हिडच्या काळात या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून काय निर्णय घेतला? केंद्राने यांना मदत केली. यांना आपआपसातल्या भांडणातून फुरसत मिळत नाही. त्यांच्यात वाद आहेत. नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात सतत काऊंटर करत आहेत, असं दरेकर म्हणाले.प्रीतम मुंडे यांना केंद्रात मंत्रिपद न मिळाल्याने पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. त्यावरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. पंकजाताईंकडून दबावतंत्र वापरले जात नाही. पंकजाताईंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्या नाराज नाहीत. काल राष्ट्रीय सचिवांची बैठक होती. त्यासाठी त्या दिल्लीत गेल्या होत्या, असे दरेकर म्हणाले. आपल्या नेत्याला पद मिळावे असे कार्यकर्त्यांना वाटत असते . ते स्वाभाविक आहे. पण पंकजा मुंडे या कार्यकर्त्यांना समजावतील, असेही त्यांनी स्पष्ट केले .








