जिल्हा प्रशासनाकडून पालखी प्रमुखाशी समन्वय असावा व त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक पालखीसाठी एक नोडल अधिकारी व सहायक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज पालख्या पुणे येथे आल्यानंतर मुक्कामाच्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था व स्वच्छता अनुषंगाने 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती, पुणे येथूनच ते सोबत राहणार
सोलापूर जिल्ह्यात पालखी प्रवेशावेळी प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांनी पालखीचे स्वागत करणे बंधनकारक
सोलापूर-आषाढी शुद्ध एकादशी 25 जुलै 2026 रोजी आहे. या अनुषंगाने मानाच्या पालख्या 16 जुलै पासून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करतात. त्यावेळी त्यांच्या मुक्काम, रिंगण, विसाव्याच्या ठिकाणी तसेच रस्ते मार्गावर त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही याचा समन्वय साधण्यासाठी प्रत्येक मानाच्या पालखीसाठी एका नोडल अधिकाऱ्याची व त्यांना सहाय्यक अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांनी पालखी प्रमुखाशी समन्वय ठेवून सोपवलेली जबाबदारी एक “टीम वर्क” म्हणून पार पाडून वारी यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन यांनी केले.
मानाच्या पालख्यांसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकारी सहाय्यक अधिकारी तसेच शौचालयाची तपासणी करण्यासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कार्तीकेयन दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, उपजिल्हाधिकारी संतोषकुमार देशमुख, अमोलसिंह भोसले, सुमित शिंदे, नगरपालिका प्रशासन सह आयुक्त आशिष लोकरे, तहसीलदार सैफन शेख, तहसीलदार सरस्वती पाटील, जिल्हाधिकारी कार्यालयात तर सर्व नियुक्त केलेले अधिकारी ऑनलाईन द्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन म्हणाले की, सर्व नोडल अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडावी. आज पासूनच नियुक्त केलेल्या पालखी प्रमुखाशी बोलून घ्यावे. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्यात आल्यानंतर पालखी समवेत राहून पालखीच्या मुक्काम, विसावा रिंगण या ठिकाणाला भेटी द्याव्यात. तसेच रस्ते मार्गाची पाहणी करावी. पाहणी दरम्यान अडचणी असतील त्याबाबतची माहिती तात्काळ प्रशासनाला कळवावी. तसेच पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करताना संबंधित नोडल अधिकारी यांनी पालखीचे यथोचित स्वागत करण्याबाबतचे निर्देशही त्यांनी दिले.
संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्यानंतर पालखी समवेतच राहणे बंधनकारक आहे. तसेच पालखी मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या व सकाळच्या वेळेला विज पाणी व शौचालयाची समस्या निर्माण होण्याची शक्यता असल्याने त्याबाबत अगोदरच माहिती घेऊन त्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी स्पष्ट केले. त्याप्रमाणेच मागील वर्षीचा अनुभव लक्षात घेऊन शौचालयाची व्यवस्था उत्कृष्ट पद्धतीने करण्यासाठी स्वतंत्र दोन टीम च्या माध्यमातून 12 अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. या अधिकाऱ्यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत पुणे येथून राहून मुक्कामाच्या ठिकाणी पुरवठादारने दिलेल्या शौचालयाची पाहणी करावी ते व्यवस्थित आहेत का याची खात्री करावी तसेच एका ठिकाणाहून पुढच्या ठिकाणी ते योग्य वेळेत पोहोचले पाहिजेत या दृष्टीने त्यांच्याशी संवाद ठेवून कार्य करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी कार्तीकेयन यांनी सांगितले. तसेच या टीमने दिवसातून सकाळ दुपार व रात्री असे तीन वेळा कॉल करून प्रशासनाला माहिती देणे आवश्यक असल्याचे सांगितले.
प्रारंभी अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी सर्व मानाच्या पालखी प्रमुखांशी तसेच पुणे येथून पालख्या सोबत शौचालयाची व्यवस्था पाहणी व पुरवठादार यांच्याशी समन्वय ठेवण्याच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्याची माहिती सविस्तरपणे सांगितली. व दिलेल्या आदेशाप्रमाणे प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी निर्देशित केले.











