येस न्युज मराठा नेटवर्क : अमेरिकेच्या सत्ताकारणात आजपासून बायडन पर्व सुरू होण्यासोबत नवीन इतिहासही रचला जाणार आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस शपथ घेणार आहेत. कमला हॅरीस या अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती असणार असून या पदावरील त्या आफ्रिकन आणि आशियाई वंशाच्या पहिल्या व्यक्ती ठरल्या आहेत. कमला हॅरीस यांची आई भारतीय वंशाच्या आहेत.
कॅलिफोर्नियाच्या सिनेटर असलेल्या कमला हॅरीस या राष्ट्राध्यक्षपदासाठी उत्सुक होत्या. मात्र, प्रायमरीमध्ये त्या बायडन आणि सँडर्स यांच्या तुलनेत मागे पडल्या होत्या. राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवारी स्पर्धेतून कमला हॅरीस बाहेर पडल्यानंतर उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांच्याच नावाची चर्चा सुरू होती. अखेर जो बायडन यांनी ‘रनिंग मेट’ म्हणून कमला यांच्या नावाची घोषणा केली. कमला यांच्यामुळे आफ्रिकन-आशियाई मतांचे पारडे डेमोक्रॅटीक पक्षाकडे मोठ्या प्रमाणावर झुकलं असल्याचे म्हटले जाते. समारोपाच्या भाषणात ट्रम्प गरजले; दिले ‘हे’ मोठे संकेत!
१९६४ मध्ये जन्म झालेल्या कमला हॅरीस यांनी आपला लहानपणीचा बराच काळ हा आजोबांसोबत (आईचे वडील) घालवला. आजोबा पी. व्ही. गोपालन झांबियाe येथे राहणारे होते. गोपालन हे भारत सरकारचे अधिकारी होते. त्यांना झिम्बाब्वेच्या शरणार्थींच्या नोंदी आणि इतर कामासाठी पाठवण्यात आले होते. त्यावेळी झिम्बाब्वे नुकताच ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला होता. माझे आजोबा हे माझ्या आवडीच्या लोकांपैकी एक असल्याचे कमला हॅरीस यांनी याआधीही सांगितले आहे.






